तीन वर्षात चार महाधिवक्ता
सरकारनामा ब्युरोनागपूर, ता. 31 ः सध्याचे महाधिवक्ता रोहित देव यांची उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाल्याने राज्य सरकारवर पुन्हा राज्यासाठी नवा महाधिवक्ता शोधण्याची वेळ आली आहे. गेल्या तीन वर्षात राज्य सरकारचे चार महाधिवक्ता बदलले.
ऑक्टोबर 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी आरूढ झाल्यानंतर नागपूरचे प्रसिद्ध विधिज्ञ व्ही. आर. मनोहर यांचे सुपुत्र सुनील मनोहर यांची महाधिवक्ता म्हणून निवड झाली. कॉंग्रेसच्या काळात डॅरियस खंबाटा 2012 पासून महाधिवक्ता होते. 19 नोव्हेंबर 2014 रोजी मनोहर यांनी महाधिवक्तापदाची सूत्रे स्वीकारली. अवघ्या सहा महिन्यानंतरच त्यांनी 1 जून 2015 रोजी व्यक्तीगत कारण पुढे करून महाधिवक्तापदाचा राजीनामा दिला. त्यानंतर विदर्भवादी श्रीहरी अणे या नागपूरच्या ज्येष्ठ विधिज्ञाची महाधिवक्तापदी नियुक्ती करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एल.एल. बी. पदवी घेतल्यानंतर काही काळ अणे यांच्याकडे "इंटर्न' म्हणून काम केले होते. अणे यांनी सप्टेंबर 2015 मध्ये महाधिवक्तापदाचे सूत्रे स्वीकारली. अणे यांनी विदर्भवादी भूमिकेबद्दल उघड मते व्यक्त केल्यामुळे वादही निर्माण झाले होते. या वादामुळे अणे यांनीही 22 मार्च 2016 रोजी राजीनामा दिला.
अणे यांनी राजीनामा दिल्यानंतर नागपूरचे विधिज्ञ रोहित देव यांच्याकडे प्रभारी महाधिवक्तापदाची जबाबदारी सोपविण्यात आली. रोहित देव यांची 31 डिसेंबर 2016 रोजी राज्याचे महाधिवक्ता म्हणून रितसर नियुक्ती झाली. परंतु सहा महिन्यांच्या आत त्यांची उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून मा. राष्ट्रपतींनी नियुक्ती केल्यामुळे राज्याचे महाधिवक्तापद पुन्हा रिक्त झाले आहे.
राज्याचे सलग तीन महाधिवक्ता नागपुरातील राहिले आहेत. आता यापुढे महाधिवक्ता नागपुरातील राहतील की, नागपूर बाहेरील राहतील, याबद्दल आता उत्सुकता आहे.
बॉक्स...
गेल्या पाच वर्षातील महाधिवक्ता व त्यांचा कार्यकाळ
डॅरियस खंबाटा- 2012 ते नोव्हेंबर 2014
सुनील मनोहर- नोव्हेंबर 14 ते जून 15
श्रीहरी अणे- सप्टेंबर 15 ते मार्च 16
रोहित देव- मार्च 16 ते डिसेंबर 16 (प्रभारी महाधिवक्ता)
रोहित देव- डिसेंबर 16 ते मे 2017


0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा