आमदार सुरेश धस्स आणि 'करूणामूर्ती' मुंडें भेट
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरून गेल्या काही दिवसांपसून राज्याचे राजकारण तापलेले असताना भाजपचे आमदार सुरेश धस यांनी राज्यातील करुणामूर्ती मंत्री धनंजय मुंडे यांची गुप्त घेतली. यावेळी राज्याचे ज्येष्ठ मंत्री चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा उपस्थित होते. या भेटीला त्यांनी दुजोरा दिला आहे.
जवळपास दोन महिन्यांपूर्वी सरपंच संतोष देशमुख यांनी निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या हत्येचा आरोप मंत्री धनंजय मुंडे यांच्या विश्वासू लोकांवर आहे. याप्रकरणात त्यांना अटक करण्यात आली असून धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपचे आमदार सुरेश धस वारंवार करीत आले आहेत. परंतु अचानकपणे करुणामूर्ती धनंजय मुंडे यांच्या डोळ्यात काही समस्या निर्माण झाली. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. या वृत्ताने आमदार सुरेश धस यांच्या हृदयात धस्स झाले. करुणामूर्ती मुंडे यांच्या आरोग्याबद्दल त्यांच्या मनात कल्लोळ उठला. त्यांची प्रकृती कशी आहे. यामुळे त्यांना अन्नही गोड लागत नव्हते. शेवटी ते एकाच राज्यातील लोकप्रतिनिधी आहेत. त्यांना त्यांची भेट घ्यावी वाटली. राजकीय मतभेद असले तरी मनभेद नाहीत. महाराष्ट्राची ही परंपरा उज्वल आहे.
आता करुणामूर्ती धनंजय मुंडे आजारी आहेत, त्यांच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया झालेली असताना आमदार धस मात्र तब्बल साडेचार तास त्यांच्यासोबत होते. तब्येतीची पक्की विचारपूस करूनच आमदास धस बाहेर पडले. खरे तर आजारी व्यक्तीची भेट घेतल्यामुळे इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. त्यामुळे आजारी व्यक्तींना फार वेळ भेटू नये, असा सल्ला डॉ. सामान्य आगंतुकांना देत असतात. परंतु सुरेश धस्स हे सामान्य आगंतुक नव्हते. ते करुणामूर्तीच्या भेटीला रवाना झाले होते. त्यांना दुःखाच्या या प्रसंगी त्यांची किमान साडेचार तास वास्तपुस्त करणे आवश्यक होते. औचित्य औचित्य म्हणजे तरी वेगळे काय असते हो. या आधुनिक काळातील राम-भरताच्या भेटीच्यावेळी महाराष्ट्राचे दुसरे कर्तव्यदक्ष मंत्री चंद्रशेखर बावनकुळे दस्तुरखुद्द उपस्थित होते. या विचारपुशीमध्ये काही कमतरता राहणार नाही. शेवटी एखाद्या प्रश्नाचा निकाल लावण्यात बावनकुळे यांचा हात कुणीही धरत नाही. कारुण्याचा एक एक पदर उलगडत जाण्यासाठी बावन्नकुळे यांचा हातखंडा आहे. यापूर्वी त्यांनी अशा छोट्यामोट्या प्रतापांचे योग्यरितीने निराकारण केले आहे. परंतु संतोष देशमुख प्रकरण जरा अधिकच किचकट झाले होते. त्यामुळे डोळ्यावर गंभीर परिणाम झाला होता. त्यामुळे या डोळयाची निगा राखणे आवश्यक होते. नाही तर महाराष्ट्रातील करुणामूर्तीच्या एक डोळा अधू होण्याचा धोका होता. करुणामूर्ती मुंडेच्या एका डोळ्याशी असा खेळ करणे राज्याच्या राजकारणाला नाही राज्याच्या एकूणच परंपरेला परवडणारे राहणार नाही. असे करुणामूर्ती कलियुगात महाराष्ट्रात उपजणे हाच खरा तर महाराष्ट्र धर्म आहे. यात आमदार सुरेश धस्स अधर्म करू धजणार नाही. परंंतु आमदार धस्स यांनी गुप्त भेट घेण्याऐवजी ओपनमध्ये भेट घेतली असती तर बरे झाले असते. कारण काहींना ओपन खेळण्याचा बँकॉकचा अनुभव पाठीशी आहे. कदाचित आमदार धस्स यांना हे महाज्ञान नसावे. तसाही बीज हा मागासलेला जिल्हा असल्याने हे माहित नसावे. करुणामूर्ती मुंडे यांची भेट आमदार धस्सा यांनी घेऊन महाराष्ट्राच्या जनतेवर जे उपकार केले. त्याची परतफेड आता कशी करायची, याचा आता महाराष्ट्रातील जनतेला विचार करावा लागणार आहे. दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या स्मृतीला अभिवादन.
ReplyForward |


